সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, October 21, 2012

झाडीबोलीची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र­ाच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात.
विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंगभूमीला ‘झाडीपट्टी’ असं नाव पडलं आहे.
झाडीपट्टी रंगभूमी’ म्हणजे विदर्भातल्या दाट जंगलांमधल्या आदिवासी खेड्यांमधला आगळावेगळा मंचीय आविष्कार. स्थानिक बोली, स्थानिक कलाकार, नृत्य आणि संगीत, तसंच पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटकं ही या रंगभूमीची खासियत.
शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा इथे टिकून आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रंगभूमीचे दिवस संपल्याची चर्चा होत असताना जंगलांमधली ही रंगभूमी अजूनही ‘जिवंत’ आहे; इथल्या आदिवासींच्या मनोरंजनाचा हा मुख्य स्रोत आहे. पुढच्या महिन्यात झाडीपट्टी रंगभूमीचा यावर्षीचा सीझन सुरू होतोय; त्या निमित्ताने....

झाडीपट्टी रंगभूमीला सुमारे १०० ते १२५ वर्षांचा इतिहास आहे, पण हा इतिहास तेवढाच मनोरंजक आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्य़ात झाडांचे पट्टे होते आणि त्यावरून या चार जिल्ह्य़ांची ओळख झाडीपट्टी अशी झाली. प्रकाश, ध्वनी व्यवस्था नसताना मनोरंजनासाठी दंडार हा प्रकार या जिल्ह्य़ातील खेडय़ात सुरू झाला. दंडारीचे रूपांतर तमाशात आणि तमाशाचे रूपांतर नाटकात आणि मग झाडीपट्टीत ही नाटके सादर होत असल्याने त्याला झाडीपट्टी रंगभूमी, असे नाव पडले. आजूबाजूला मशाली लावायच्या, त्यातही दूरच्या लोकांना दिसावे आणि ऐकू जावे म्हणून चेहऱ्यावरचे हावभाव ताणून, जोराने हातवारे करीत नाटक सादर करायचे. नंतरनंतर हा प्रकाश कमी पडू लागल्याने कलावंतच हातात मशाली, त्यानंतर कंदील घेऊन नाटक सादर करायचे. सुरुवातीला पौराणिक, नंतर ऐतिहासिक व त्यानंतर लावणीप्रधान नाटकाची परंपरा आणि आता सामाजिक नाटके या रंगभूमीवरून सादर केली जातात. झाडीपट्टी रंगभूमीवर तालमी हा प्रकार नव्हताच. त्यामुळे पाठांतर व्हायचे नाही आणि मागून कुणीतरी प्रॉम्टींग करीत कसेबसे नाटक सादर व्हायचे. आज यात थोडाफार बदला झाला आहे तरीही प्रॉम्टींग हा प्रकार अजूनही सुरूच आहे. शंभर लोकांच्या खेडय़ात बाजाराच्या दिवशी प्रत्येक घरात किमान ४० तरी पाहुणे असायचे. घरात राहण्याची सोय नाही, अंथरूण, पांघरूणाची सोय नाही.



झाडीबोलीची वैशिष्ट्ये

  • झाडीबोलीत प्रमाण मराठीतील सर्व स्वर आहेत.
  • या बोलीत छ, श, ष, आणि स या चार व्यंजनांचे कार्य एकटे स हे व्यंजन पार पाडते.
  • न आणि ण ऐवजी फक्त न वापरला जातो.
  • उच्चाराच्या संदर्भात झाडीबोलीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या बोलीत च, ज आणि झ या व्यंजनांचा केवळ तालव्य उच्चार ऐकायला मिळतो. म्हणजे चमच्यातला च, जसामधला ज आणि झग्यातला झ नाही.
  • 'ळ' या व्यंजनचा उच्चार 'र' असा होतो. त्यामुळे काळा, कावळा, पोळा हे शब्द कारा, कावरा, पोरा असे कानावर पडतात.
  • या बोलीत केवळ पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहेत. प्रमाण मराठीतील नपुंसकलिंग या बोलीत आढळत नाही.
  • शिवाय अनेक शब्दांचे लिंग मराठीपेक्षा वेगळे आहे. उदाहरणार्थ या बोलीत नाटक हा शब्द स्त्रीलिंगी आहे, तर जागा पुल्लिंगी आहे.
  • मराठीप्रमाणेच या बोलीत उली हा प्रत्यय लघुत्ववाचक आहे. उदा० कोटा-कोटुली, मारा-मारुली, गाडा-गाडुली इत्यादी.
  • नामाच्या लिंगानुसार एकवचनात 'हा', 'ही', 'हे' आणि अनेकवचनात 'हे', 'ह्या', 'ही' अशी सर्वनामे प्रमाण मराठीत वापरली जातात. अशी वेगवेगळी सर्वनामे न वापरता झाडीबोली केवळ 'ह्या' हे एकच सर्वनाम वापरून आपला कारभार पार पाडते.
  • प्रथम पुरुषी एकवचनात मी केलू, मी धरलू अशी उकारांत क्रियापदे वापरण्याची या बोलीची लकब प्राचीन ओव्यांची आठवण करून देणारी आहे.
  • प्रथम पुरुषी अनेकवचनातील आमी केलून, आमी धरलून अशी वाक्यरचना होते.
  • करजो, देजो, पायजो ही आज्ञार्थी रूपे आहेत.
  • 'मी जावासीन ना तो मरावासीन'(मी गेलो आणि तेव्हाच तो मेला) ही सामान्य क्रियापदाची वेगळी रचना या बोलीत आढळते.

[संपादन]झाडीबोलीतील काही खास शब्द

शेतीचा माल इकडून तिकडे नेण्याकरिता जे साधन वापरतात त्यास ‘बंडी' असे संबोधले जाते. अन्यत्र हाच शब्द पुरुषाच्या अंगातील वस्त्राकरिता वापरत असले, तरी गोंडी व माडिया या आदिवासींच्या भाषांसह दक्षिणेतील तामीळ, तेलगू, मल्याळम इत्यादी सर्वच भाषांमध्ये ‘बंडी' हा शब्द ‘मालवाहतुकीचे साधन' याच अर्थाने रूढ आहे. यावरून ‘बंडी' या शब्दाचे प्राचीनत्व कळून येऊ शकते. शेतातून तनीस किवा गवत घरी आणणे, कापलेल्या धानाचे भारे खळ्यावर आणणे, चुरलेल्या धानाची रास खळ्यावरून घरी आणणे, तोडलेल्या झाडाची लाकडे आणणे, घर बांधण्याकरिता विटा, रेती वगैरे साहित्य आणणे अशा अवजड वस्तूंना वाहून नेण्याकरिता बंडी वापरली जाते. बाजारात विक्रीकरिता धान्य किवा इतर उत्पादने घेऊन जाण्यासाठीदेखील बंडी उपयुक्त ठरते.
बंडीला दोन चाके असतात. तिच्या झाडीपट्टीमध्ये माल वाहून प्रत्येक चाकास ’भोवरी' हा शब्द आहे, तर या भोवरीवर जी लोखंडी धाव असते तिच्याकरिता झाडीबोलीत ‘येट' हा पर्याय वापरला जातो. ती ज्या दोन लांब लाकडांवर आधारलेली असते त्यांच्यापैकी प्रत्येक लाकडास ‘धुरा' म्हणतात. तिचे जे जू असते त्याचा नामविस्तार करून त्यास ‘जुवाडा' हा शब्द झाडीबोलीने प्रचारात आणला आहे. हा जुवाडा खाली ठेवणे अनेकदा शक्य नसते. त्याकरिता जो तिपाया वापरण्यात येतो त्यास ‘ढिरा' हा शब्द प्रचलित आहे. बंडीच्या बैलांना हाकण्याकरिता जो जाड आसूड किवा चाबूक वापरला जातो त्याला ‘सटका' असे नाव आहे. पूर्वी महाशिवरात्रीला महोदवास जाणारा जो पोवा असायचा त्यातही अशा अनेक बंड्यांचा समावेश असे. म्हणूनच लोकनाट्यात गायल्या जाणाऱ्या ‘पोवाडा' या शब्दाची व्युत्पत्ती झाडीबोलीतल्या पोवा या शब्दावरून असावी.
प्रवासाकरिता झाडीपट्टीत जे वाहन वापरले जाते त्यास ‘खाचर' किवा ‘खासर' असे नाव आहे. तिचे स्वरूप बंडीसारखेच असले, तरी तिचा आकार मात्र बंडीपेक्षा लहान असतो. शिवाय निर्मितीच्या दृष्टीने बंडी ही ओबडधोबड असते, तर खासर ही त्यामानाने व्यवस्थित असते. पूवी परगावी नातेवाईकांकडे जायला खासर हेच साधन उपलब्ध होते. तेव्हा विवाहाकरिता खासरानेच जावे लागायचे. किबहुना लग्नाला अथवा वरातीला किती खासरा येणार आहेत त्यावरून त्या सोयऱ्याचा दर्जा ठरविण्याची विचित्र पद्धती त्या काळी रूढ होती. खासरेच्या पुढल्या भागात धुऱ्यावर एक टोपली ठेवलेली असे. या टोपलीत किरकोळ साहित्यासह खाजाचा झोलना असे. लहान मुलांना पाहुण्यांकडून मिळणारा स्वादिष्ट उपहार म्हणून या झोलन्याकडे मुलांचे अधिक लक्ष असायचे. खासरेच्या बैलांना हाकण्याकरिता जी पराणी वापरली जाते तिला झाडीबोलीत ‘तुतारी' हा शब्द आहे. बैलांना टोचण्याकरिता त्या तुतारीला जे लोखंडी खिळ्याचे टोक असते त्यास ‘आरू' असे संबोधले जाते.
नेहमीची खासर ही ‘बोडकी खासर' होय. पुरुष मंडळी अशा खासराने प्रवास करणे योग्य समजत असत. विशेषत: जंगलात शिकारीकरिता जायचे म्हटले की, सभोवतालचे निरीक्षण करणे हे आलेच. म्हणून या कामी बोडकी खासर अतिशय उपयुक्त समजली जायची. कांबीपासून करंडी म्हणजे बुरुड या स्थानिक बलुतेदार कारागिराने तयार केलेले आवरण होय. बांबूला झाडीपट्टीत येरूबास व करकहे अन्य तीन पर्याय वापरले जातात आणि बांबूचे जे रान असते त्यास ‘रांजी' हा खास झाडी शब्द वापरला जातो. आवरण असलेली ‘चापेची खासर' ही खास महिलांची मक्तेदारी असते. शिवाय या बासाच्या चापेवरही रंगीत कापडाचे आवरण असलेली नवरीसारखी सजलेली ‘पडद्याची खासर' खास नववधूकरिता वापरली जाते. कुटुंबाने जायचे असल्यासदेखील चापेची खासर पूर्वी वापरायचे. लग्नास जाण्याकरिता महिलांना अशाच खाचरांची गरज असे. खाचर बोडकी असो की चापेची, खाचरेत बसून पाच-सहा व्यक्ती सहज प्रवास करू शकतात.
पण, पटाकरिता एवढे मोठे साधन वापरणे येथील जाणकारांना अजिबात पसंत नाही. त्याकरिता त्यांनी केवळ एक अथवा जास्तीत जास्त दोन माणसे वाहून नेणारे नवीन साधन सिद्ध केले. त्यास झाडीबोलीत ‘सेकडा' किवा ‘छकडा' हे नाव आहे. स्थानिक वाढई म्हणजे सुतार याच्या कारागिरीचा विशेष नमुना म्हणून हा सेकडा पाहण्यासारखा असतो. बंडी, खासर व सेकडा यांचा आकार व उपयोग याचा विचार करता ट्रक, कार व फटफटी या आज उपलब्ध असलेल्या यांत्रिक वाहनांची झाडीपट्टीतील परंपरागत वाहनांशी तुलना करावयाची झाल्यास येथील बंडी म्हणजे मालवाहू ट्रक असून, खासर ही चारचाकी कारसारखी उपयोगात आणली जाते, तर सेकडा म्हणजे केवळ एकट्यादुकट्याने प्रवास करण्यास योग्य अशी फटफटी म्हणता येईल.


लोकसाहित्य

झाडीबोलीत लोकसाहित्याचे अपार भांडार आहे. क्रीडागीते, पाळणागीते, सासुरवाशिणीची गीते अनेक आहेत. धानाची रोवणी करताना बायकांच्या मुखातून रोवण्याची गाणी ऐकू येतात. महाशिवरात्रीला महादेवाच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या मुखांतून महादेवाची गाणी उमटतात. पोळयाला अकरावर गायल्या जाणाऱ्या झडत्या आणि घोडा नाचताना गायले जाणारे बिरवे त्या त्या प्रसंगीच ऐकायला मिळतात.
झाडीबोलीमध्ये भिंगीसोंग आणि दंडीगान सादर करणारे भिंगी व दंडी कितीतरी वर्षांपासून झाडीपट्टीतील जनतेचे रंजन करीत आहेत. दंडार, खडीगंमत, गंगासागर, डाहाका आणि गोंधड हे लोकरंजनासोबत लोकप्रबोधनाचा वसा घेतलेले काव्यप्रकार आहेत.

प्रकाशित साहित्य

झाडी बोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील कथा १६ मार्च १९८० च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कविता समजली जाते.
  • 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.


कविता संग्रह

  • सपनधून (कवी ना.गो. थुटे-१ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित कवितासंग्रह.
  • अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे-९ जाने २०००)
  • आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल -९ जानेवारी २०००)
  • हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद)-२००२)
  • रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे-२००२)
  • कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर-२००२)
  • माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार-२००२)
  • झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार-२००३)
  • झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत)-२००६)
  • आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल-२००४)
  • अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे-२००५)
  • सोनुली (पांडुरंग भेलावे-२००६)
  • मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले-२००७)
  • माजी मायबोली (बापुराव टोंगे-२००८)
  • झाडीची माती (मिलिंद रंगारी-२००८)
  • मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
  • रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
  • घामाचा दाम (डोमा कापगते)
  • कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह - संपादक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ना. गो. थुटे-२००२)इत्यादी.

कथासंग्रह

  • वास्तुक (घनश्याम डोंगरे.१९९८) झाडीबोलीतला पहिला कथासंग्रह.
  • पोरका (मा.तु. खिरटकर-२००१
  • गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर-२००१)
  • विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार-२००२)
  • चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे-२००८)
  • कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे-२००९)
  • झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल-२००१)


कादंबऱ्या/चरित्रे

  • भाराटी (घनश्याम डोंगरे)
  • बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
  • झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे-२०१२)
  • अन्य साहित्य

    • झाडीबोली मराठी शब्दकोश (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
    • झाडी बोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
  • झाडीबोली साहित्य संमेलने

    • १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय या
    मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.
    • इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कै.प्रा.द.सा.बोरकर यांनी भूषविले होते.
    • झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.

झाडीपट्टी रंगभुमित गाजलेली नाटकातील गीतांची सीडी :
१. तुजे काजलाचे डोले... गीतकार : संतोष कुमार
२. साजनी मी तुझा ग दीवाना..... गीतकार : संतोष कुमार
३. सारा गाव निजलेला ....... गीतकार : अनिरुद्ध वनकर ,आकांशा नगरकर ,प्रशांत कुमार
४. बुदुर बुदुर सांडते..... गीतकार: अमर मसराम, अनिरुद्ध वनकर, मृणाल खोब्रागडे आणि इतर
५. भूक..... गीतकार: युवराज प्रधान, शबाना खान
६. गोरी गोरी झुम्केवाली .... गीतकार: हीरालाल पेंटर
७. झाडिचा हिरा मानाचा तुरा ..... गीतकार: हीरालाल पेंटर
८. सुर प्रितीचे..... गीतकार :कैलाश बोरकर , अनिरुद्ध वनकर



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.